मनपा वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन !

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते अझहर खान, रफीक कुरेशी,युवराज दाखले,अजिझ शेख,अहमद कुरेशी, साजिद शेख तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, तसेच अनेक वर्ष तुरुंगावासही भोगला. देशातील सामाजिक ऐक्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन एकता जतन करण्यासाठी अविरत प्रयत्न केले, त्याचप्रमाणे भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते देशाचे पहिले शिक्षणमंत्री झाले. शिक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणले. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे महत्वपूर्ण योगदान तसेच त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च किताब बहाल केला आहे.
