पिंपरी चिंचवडबातम्या

अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ ‘वृक्ष अंत्ययात्रा’ 

आप युवा आघाडीचा आक्रमक पवित्रा

– दोषी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयाशेजारी झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी (आप) पिंपरी-चिंचवड शहर आणि महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) ‘वृक्ष अंत्ययात्रा’ आंदोलन करण्यात आले. जुन्या वृक्षांची कत्तल, पर्यावरणाचा ऱ्हास आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबत या आंदोलनातून महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारण्यात आला असून दोषी बिल्डर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

महापालिकेच्या मुख्यालयाशेजारील बांधकाम प्रकल्पासाठी ५२ पेक्षा अधिक जुन्या वृक्षांची संख्या आणि वय कागदपत्रांमध्ये कमी दाखवून बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केलेला आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिकाला आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या मूळ अहवालात फेरफार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही पक्षाने केला आहे. या प्रकरणात उद्यान अधीक्षक महेश गारगोटे आणि राजेश वसावे यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनातून युवक आघाडीने प्रशासनासमोर विविध मागण्या ठामपणे मांडल्या. कथित बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी सुखवानी असोसिएट्स या बांधकाम व्यावसायिकासह संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत. दिशाभूल करून मिळविल्याचा आरोप असलेली बांधकाम परवानगी रद्द करावी. नियमानुसार १,०१८ झाडे लावण्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने प्रति वृक्ष १५ हजार रुपये याप्रमाणे सुमारे १ कोटी ५२ लाख ७० हजार रुपयांची रक्कम वसूल करण्याची मागणी करण्यात आली.

*पर्यावरणाची हानी करणा-यांना वाचवू नका: रविराज काळे 

शहराचा पर्यावरणीय समतोल राखणाऱ्या जुन्या वृक्षांची कत्तल होत असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत होती, असा सवाल उपस्थित करत आप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, वृक्षतोडीच्या प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आल्यानंतरही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांना कोणाचे अभय आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. या वृक्षतोडीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. बिल्डर कितीही मोठा असला, तरी कायद्यापेक्षा मोठा नाही. कागदपत्रांमध्ये फेरफार करून पर्यावरणाची हानी केली असेल, तर संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असे रविराज काळे यांनी म्हटले आहे*

 आंदोलन अधिक तीव्र करण्याचा प्रशासनाला इशारा

महापालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हे प्रकरण आणून दिल्यानंतरही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप आप युवा आघाडीने केला. प्रश्न केवळ काही वृक्षांच्या कत्तलीचा नाही; तर शहराच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या उत्तरदायित्वाचा आहे. आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणणे आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई करणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आप युवक आघाडीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला. यावेळी आम आदमी पार्टी सचिव अभिजीत मोरे, समन्वयक अमित मस्के, कामगार आघाडी संघटक संजय कोणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे, शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, पुणे शहराध्यक्ष धनंजय बनकर, युवक शहराध्यक्ष विकी पासोटे, सुरेश गायकवाड, अंकुश लांडगे, यशवंत कांबळे, लक्ष्मण माने, सुप्रिया गायकवाड, अजय सिंग, शुभम यादव, सुरेश बावनकर, सुभाष कारंडे, कुणाल गोरडे, राहुल मुदनोर, राहुल मदने, सुनिता काळे, कविता कोंडे, गौतम अडसूळ, अंकुश डोंगरे, गौतम तायडे, अखिल शेख, अंगद मुद्दे, सुरज झिटे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते