निवडणूक आयोग आणि देशातील सुशिक्षित तरुणाईच्या अपमानाप्रकरणी जाहीर माफी मागा; काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर भाजप आमदार अमित गोरखे यांचा तीव्र संताप

पिंपरी चिंचवड : महाविकास आघाडीच्या सभेत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आणि देशातील सुशिक्षित तरुणाईबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेले विधान अत्यंत बेजबाबदार आणि निंदनीय आहे. राजकीय फायद्यासाठी देशातील सुशिक्षित तरुणाईची तुलना अतिरेक्यांशी करणे, हा भारतीय युवाशक्ती आणि संविधानाचा घोर अपमान आहे, अशा शब्दांत भाजपा आमदार गोरखे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला.
जाहीर माफी मागा!
आमदार अमित गोरखे यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानची भीती दाखवून तरुणांची दिशाभूल करण्यापेक्षा काँग्रेसने आपल्या सत्ताकाळातील तुष्टीकरण आणि पोसलेल्या दहशतवादाचा इतिहास आधी तपासून पाहावा. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून द्वेषाचा चष्मा बाजूला ठेवून खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या विधानाचा फेरविचार करावा आणि देशातील युवाशक्तीची जाहीर माफी मागावी. भारतीय जनता पक्षाची विचारसरणी ही ‘राष्ट्रप्रथम’ या तत्त्वावर आधारित आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आज भारतातील तरुण तंत्रज्ञान, इस्रो (ISRO), डिजिटल इंडिया आणि इनोव्हेशन क्षेत्रात संपूर्ण जगाचे नेतृत्व करत आहेत. असे असताना राजकीय स्वार्थासाठी युवाशक्तीचा आणि घटनात्मक संस्थांचा असा अवमान करणे म्हणजे थेट संविधानाचा आणि भारतीय तरुणांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे.
वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी…
केंद्रीय निवडणूक आयोग ही कोणत्याही राजकीय पक्षाची बाहुली नसून, देशातील लोकशाहीचा कणा असलेली अत्यंत स्वायत्त आणि निष्पक्ष संविधानिक संस्था आहे. अपयशाच्या भीतीपोटी किंवा मतदारांचा कौल स्वीकारण्याचे धैर्य नसल्यामुळे निवडणूक आयोगासारख्या अत्यंत विश्वासार्ह संस्थेवर अशाप्रकारे बिनबुडाचे आरोप करणे, हा थेट भारतीय राज्यघटनेचा आणि लोकशाही प्रक्रियेचा घोर अपमान आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमने नेहमीच निःपक्षपातीपणे, अत्यंत पारदर्शक वातावरणात आणि पारदर्शक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी अशा घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, भारत हा संविधानाने चालणारा देश आहे; आणि देशाचा डीएनए हा कोणत्याही राजकीय स्टंटबाजीतून नाही, तर भारतीय जनतेच्या स्वाभिमानी मतदानातून सिद्ध होतो. केंद्रीय निवडणूक आयुक्तांसारख्या घटनात्मक पदांवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रप्रेमी संघटनेवर बिनबुडाचे आरोप करून दिशाभूल करण्याचे काम काँग्रेस खासदार करत आहेत. देशातील जनता आणि जागरूक युवाशक्ती या विकृत राजकारणाला नक्कीच चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वासही आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला.
