पिंपरी : दहीहंडीच्या स्टेजच्या कमानीचा लोखंडी अँगल अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू, गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस म्हणतात…
पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी येथे दहीहंडीच्या स्टेजची कमान उतरवताना लोखंडी अँगल अंगावर पडल्याने सलमा पठाण या ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पिंपरी : दहीहंडी फुटल्यानंतर स्टेजची कमान उतरवीत असताना लोखंडी अँगल अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास पिंपरी-चिंचवड मधील जुनी सांगवी येथे घडली. सलमा पठाण (वय ४५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी माहिती दिली. जुनी सांगवी लेन नंबर दोन येथील विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळाची दहीहंडी शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास फुटली. दहीहंडी पाहण्यासाठी सलाऊददीन पठाण व त्यांची पत्नी सलमा पठाण हे दोघे आले होते. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर सलमा या परत घरी जात होत्या. त्याचवेळी स्टेजची कमान उतरविण्याचे काम सुरू होते. कमानीचा लोखंडी अँगल सलमा यांच्या अंगावर पडला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. औंध हॉस्पिटल येथे उपचाराकरीता नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
या विघ्नहर्ता दहीहंडी मंडळात मयत सलमा यांचा मुलगा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या महिलेचे पती, मुलगा व इतर नातेवाईक या घटनेबाबत तक्रार देण्यास तयार नाहीत. अकस्मात मयत दाखल करुन पुढील योग्य ती कारवाई केली जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले.
स्टेजला परवानगी होती का, कमान उतरविण्याचे काम कोणाला दिले होते, काम करताना योग्य ती खबरदारी घेतली होती का, याची चौकशी केली जाणार का, याबाबत विचारले असता याप्रकरणी सर्व चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले.
